मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 20, 2014, 04:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.
प्रचारासाठी मुंडे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. जामनेर इथं जाहीर सभा आटोपल्यानंतर ते रात्री महाबळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, सुरगाणा आणि येवला इथं त्यांच्या जाहीर सभा असल्यानं त्यांना सकाळी ९ वाजताच हेलिकॉप्टरनं रवाना व्हायचं होतं. ते सकाळी ९पर्यंत तयार झाले. विमानतळाकडे निघण्याची वेळ झाली. मात्र त्यांना घेऊन जाण्यासाठी ना उमेदवार उपस्थित होते ना पदाधिकारी! विमानतळावर जाण्यासाठी वाहन तयार ठेवा, अशी सूचना त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकास केलेली असतानही वाहन उपलब्ध झालं नाही. हा प्रकार पाहून त्यांचा पारा अधिकच चढला.
संतापलेले मुंडे हॉटेलबाहेर आले आणि रिक्षात जाऊन बसले. त्यांच्या सोबत उपनिरीक्षक कुंभारही रिक्षात बसले. सुरक्षा पथकातील एक पोलीस वाहन रिक्षाच्या पुढं होते व एक मागे. रिक्षा हळूहळू आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक मार्गे थेट विमानतळाकडे निघाली. ही माहिती मिळताच भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच हादरले. फोनाफोनी सुरू झाली. माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी वाहनानं रिक्षाचा पाठलाग केला आणि इच्छादेवी चौकात रिक्षा गाठली. मुंडे यांना त्यांच्या चारचाकी वाहनात बसण्याची विनंती केली. मला रिक्षाचालकाचा अपमान करायचा नाही, असं म्हणत त्यांनी रिक्षातून खाली उतरण्यास सपशेल नकार दिला.
अजिंठा चौकात रिक्षा पोहोचल्यानंतर पुन्हा जगवाणी यांनी त्यांना विनंती केली. माफी मागितली. भर रस्त्यावर हा प्रकार सुरू होता आणि शहरवासीयांना मुंडे रिक्षात बसले असल्याचं दिसताच गर्दी होऊ लागली. हा प्रकार मुंडेंच्या लक्षात येताच ते रिक्षातून उतरले आणि चारचाकीत बसले आणि विमानतळाकडे रवाना झाले. आमदार गिरीश महाजन, माजी आमदार पाशा पटेल, रघुनाथ कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी विमानतळावर पोहोचले. झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी मुंडे यांच्याकडे माफी मागितली. मात्र त्यानंतरही मुंडे यांचा पारा चढलेलाच होता.
दरम्यान, भाड्यापोटी रिक्षा चालकाला ३०० रुपये देण्यास मुंडे विसरले नाहीत. पदाधिकारी खडसेंच्या निवासस्थानी असून ते नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनात व्यस्त होते, त्यामुळं त्यांचं मुंडेंकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.