सुलतानपूरची लढाई वरुण गांधी विरुद्ध वरुण गांधी

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव वरुण गांधी यांच्या पूढे एक नवीन पेच निर्माण झाला आहे.

Updated: Apr 20, 2014, 03:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सुलतानपुर
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव वरुण गांधी यांच्या पूढे एक नवीन पेच निर्माण झाला आहे. वरुण गांधी यांना स्वत:च्या लोकसभा क्षेत्रात स्वत: विरुद्धच निवडणूक लढवावी लागणार आहे. कारण सुलतानपुर लोकसभेच्या जागेवर वरुण गांधी नावाचे दोन उमेदवार रिंगणात उभे आहेत.
भाजपचे वरुण गांधी यांच्या विरोधात रेवडी (हरियाणा) मधले वरुण गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. हा अर्ज वरुण यांनी शेवटच्या दिवशी भरला. वरुण यांनी सांगितले की, "सुलतानपूरचा अजून देखील विकास झालेला नाही.
सुलतानपूरमध्ये रस्ते खराब आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न लोकांना भेडसावत आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आताच्या आणि आधीच्या सरकारने लोकांना फक्त फसवले आहे."
वरुण गांधी पूढे बोलताना म्हणाले की, "मी सुलतानपूरचा चारही बाजूने पूर्ण विकास करीन. तसेच मी संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रात जाऊन, लोकांनी मला मतदान करावे अशी विनंती करणार आहे. एकदा लोकांनी मला निवडून दिले की, मी दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण करीन असे त्यांना सांगणार आहे."
लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना वरुण गांधी सोबत अनेक समर्थक उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.