नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 9, 2014, 08:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. १० लोकसभा मतदारसंघात एकूण २०१ उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ३३ तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
नागपुरातील १,८२८ तर रामटेक लोक सभा मतदार संघातील एकूण २,२३१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या पैकी नागपूर लोक सभा मतदारसंघात ६१ तर रामटेक मतदार संघात ४७ मतदारसंघ संवेदनशील आहेत. नागपूर आणि रामटेक मतदार संघात मतदारांची एकूण संख्या क्रमशः १८,९९,३९५ आणि १६,७५,४१५ आहे. गोंदिया-भंडारा लोक सभा मतदार संघात मतदान यंत्राच्या घोळानंतर आता येथे देखील अधिकारी सावध झालेत.
निवडणुकीच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला आहे. नागपुरात २,५५८ तर रामटेकमध्ये १,३३५ पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर तैनात केले आहेत. एकूण जिल्ह्यात एकूण प्रचाराच्या दरम्यान १,०१२ व्यक्तींवर प्रतीबंधात्नक कारवाई केली असून एकूण ३७ अवैध शास्त्र जप्त केली आहेत.
मतदानाच्याआधी आमिष देत दारू आणि पैसे वाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात आणि हे टाळण्याकरता नागपूरला सर्व झोपडपट्टीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. एकट्या नागपूर लोक सभा मतदार संघात एकूण २८ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे, तर आदर्श आचार संहिता भंग केल्या प्रकरणी एकूण ६ गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

उद्याच्या मतदानाकरता नागपूरच्या जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाने चोख व्यवस्था आणि कडेकोट बंदोबस्त केला असला तरीही मतदान पार पडत नाही तोवर नागपूरसह संपूर्ण विदर्भाची शासकीय यंत्रणा तत्पर राहील यात मात्र कुठलीच शंका नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.