www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीचे दिवस लक्षवेधी ठरलेत. आपल्या कामाची दिशा कशी असेल हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. पाहुयात नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीपासूनच्या प्रवासाचा वेध घेणारा खास रिपोर्ट `नमो वॉच`
- राष्ट्रपती भवनात पार पडलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहका-याचा शपथविधीही वैशिष्ठपूर्ण ठरला. सार्क देशांच्या प्रमुखांसह विविध पक्षांचे नेते, विविध क्षेत्रातले मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. मोकळ्या आकाशाखाली नरेंद्र मोदींनी आपल्या प्रमुख सहकारी मंत्र्यांसोबत शपथ घेतली. ख-या अर्थानं मोदी पर्वाची ही सुरवात होती. `Minimum Govenrment, Maximum Governance` असा मंत्र जपत कॅबिनेटचा आकार मोदींनी लहान ठेवलाय.
- सार्क देशांमधील प्रमुखांची शपथविधी समारंभाला उपस्थिती आणि त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली चर्चा हेही एक महत्वाचं पाऊल होतं. पाकिस्तानं, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, भुतानसह बांगलादेशशीही चांगले संबंध ठेवणं हा भारताचा उद्देश आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निमित्तानं अधोरेखित केलंयं.
- शपथग्रहण सोहळ्यापुर्वी नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. पंतप्रधान म्हणून कार्यभार स्विकारण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर प्रथम नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला फुलं अर्पण केली आणि कारभार सुरु केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही त्यांनी जयंती दिनी मानवंदना दिली.
- मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन नरेंद्र मोदींनी एक नवा पायंडा पाडला. मनमोहन सिंगांनी गेली दहा वर्ष देशाचं नेतृत्व केलं. त्यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्यक्तिमत्वातील सर्वसमावेशक पैलूचा परिचय करुन दिला.
- आपल्या कारभाराची दिशा कशी असेल हे नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत स्पष्ट केलं. काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी एसआयटीची स्थापना हा एक महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परदेशात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणण्याचं आश्वासनं नरेंद्र मोदींना प्रचारादरम्यान दिलं होतं.
- आपल्या जवळच्या नातेवाईकांची आणि कार्यकर्त्यांची वर्णी पर्सनल सेक्रेटरी आणि स्टाफमध्ये लावू नका असा आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आपल्या मंत्र्यांना दिलायं. आता शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधूनच मंत्र्यांना आपला स्टाफ निवडावा लागणार आहे.
- नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात पीएमओला पुन्हा पुर्वीचं महत्व प्राप्त होणार हे आता स्पष्ट झालं आहे. पीएमओमध्ये राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची नियुक्तीं पंतप्रधानांनी केलीयं. जम्मू काश्मीरमधून निवडून आलेले सिंह हे नामवंत मधुमेह तज्ज्ञ, लेखक आणि स्तंभलेखकही आहेत. घटनेच्या कलम 370 वर चर्चा व्हावी असं वक्तव्य पदभार स्विकारतांनाच करुन सिंह यांनी खळबळ करुन दिलीय.
- पंतप्रधान कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र सिंह यांची निवड करुन पंतप्रधानांनी अजून एक धक्का दिलाय. निवृत्त आयएएस अधिकारी नृपेंद्र सिंह हे उत्तरप्रदेश केडरचे आहेत. सिंह यांना राज्यात आणि केंद्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. सिंह यांच्या निवडीतील कायदेशिर अडथळे दुर करण्यासाठी खास अध्यादेशही काढण्यात आला. अजित डोव्हल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून केलेली नेमणूकही महत्वाची आहे. विशेष म्हणजे पीएमओत फेरफटका मारुन इथं काम करणा-या इतर कर्मचा-यांशीही मोदींनी चर्चा केली.
- आता 7 रेसकोर्स रोड हे नरेंद्र मोदींचं नवी दिल्लीतलं निवासस्थान असणार आहे. पंतप्रधानाचं निवासस्थान म्हणजे बंगल्याचं एक संकुल आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अतिथीगृह म्हणून वापरला गेलेल्या बंगल्यात नरेंद्र मोदी राहणार आहे. इतर बंगले कार्यालय, अतिथीगृह आणि सुरक्षा यंत्रणांसाठी वापरण्यात येतील. नुतनीकरणावरचा खर्चही नरेंद्र मोदींनी टाळला आहे.
- पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा आखण्यासाठी पंतप्रधानांनी दशसूत्री जाहीर केली आहे. शिक्षण, आरोग्य, उर्जा रस्ते या क्षेत्रांना प्राधान्यक्रम, अर्थव्यवस्थेला चालना, सरकारी कामकाजात नव्या विचारांचे स्वागत, नोकरशाहीला सक्षम करणे,, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर भर, जनतेशी थेट संपर्क, कामकाजात पारदर्शकता, सरकारी धोरणांमध्ये सातत्य, जबाबदार प्रशासन आणि विविध खात्यांमध्ये समन्वय असा दहा कलमी कार्यक्रम पंतप्रधानांनी जाहीर केलाय.