मोदींच्या मंत्रिमंडळातील `सेव्हन सिस्टर्स`

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांच्या समावेश आहे, यातील सहा महिला खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Updated: May 27, 2014, 03:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांच्या समावेश आहे, यातील सहा महिला खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
स्मृती इराणी
नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकूण सात महिलांचा समावेश केला आहे. स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं आहे. स्मृती इराणी या भाजपच्या
उपाध्यक्षा आणि नरेंद्र मोदींच्या जवळच्या व्यक्तींमधील एक आहेत.
स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. स्मृती 38 वर्षांच्या आहेत, त्या मोदी सरकारमधील सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत.
मेनका गांधी
नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात असलेल्या सात महिला हा त्यातील सहा महिला या कॅबिनेट दर्जाच्या मंत्री आहेत. यातील मेनका गांधी या पीलीभीतहून निवडून आल्या
आहेत. मेनका गांधी यांचं नाव पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये घेण्यात येतं.
सुषमा स्वराज
लोकसभेत यापूर्वी विरोधी पक्ष नेत्या असलेल्या सुषमा स्वराज 1998 मध्ये वाजपेयींच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. 2003 आणि 04 मध्ये त्यांनी
आरोग्य मंत्री म्हणूनही काही काळ काम पाहिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ आणि कुशल वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
हरसिमरत कौर
हरसिमरत कौर या अकाली दलच्या आहेत, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्या त्या पत्नी आहेत. 2009 पासून
भटिंडामधून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात केली आहे.
उमा भारती
अयोध्या आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या उमा भारती, उत्तर प्रदेशातील झांसीहून निवडून आल्या आहेत. वाजपेयींच्या सरकारमध्ये उमा भारती पर्यटन राज्य
मंत्री तसेच युवक आणि क्रीडा मंत्री तसेच कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
नझमा हेफ्तुल्ला
नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये एकमात्र मुस्लिम चेहरा आहे नझमा हेफ्तुल्ला, नझमा यांचं वय 74 वर्ष आहे, त्या कॅबिनेटमध्ये सर्वात वयस्कर मंत्री आहेत. नझमा 1980 पासून राज्यसभेच्या सदस्या आहेत.
निर्मला सीतारमण
निर्मला सीतारमण भाजपाच्या जेष्ठ प्रवक्ता आहेत. निर्मला सीतारमण यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.