www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.
मुंबईतल्या कचऱ्यामुळे मुंलुंड ठाणे परिसरातल्या नागरिकांना दुर्गंधी डोळे जळजळणे आणि आजारपण या त्रासाचा सामना करावा लागतोय. महापालिका राज्यसरकार यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे आता नागरिकांना नोटाचा पर्याय वापरण्याचा निर्णय जाहीर केलाय.
या भागात प्रचंड किंमत मोजून अनेकांनी घरे विकत घेतली. मात्र इथे आल्यावर आता विकतचं दुखणं घेतल्याचा पश्चात्ताप करण्याची पाळी त्यांच्यावर आलीय. या प्रकाराची तक्रार अगदी राष्ट्रपतींपर्यंत करण्यात आलीय. मात्र सर्वच पातळ्यांवर इथे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता धडा शिकवायला नागरिक सज्ज झालेत.
नागरिकांच्या या भूमिकेमुळे उमेदवारांना नक्कीच घाम फुटणार आहे. त्यामुळे आता मतांसाठी तरी हा प्रश्न तातडीने सोडवला जावा हीच इच्छा!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.