www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल मीडियावर सध्या पॉलिटिकल वॉर सुरू झालंय... तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया साइट्सवर जोरदार फिल्डिंग लावलीय...
फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया साइट्स म्हणजे तरूणाईचा जीव की प्राण... संख्येनं सर्वाधिक असलेले तरूण मतदार सोशल मीडियाचा वापर करत असल्यानं राजकीय पक्षांनाही त्याची दखल घेणं भाग पडलंय. निवडणूक प्रचाराच्या जाहिर सभा, रॅली, रोड शो यासोबतच सोशल मीडियावर देखील राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलंय... राजकीय पक्षांच्या कार्यालयात सध्या तरुणांची एक स्वतंत्र टीमच तयार करण्यात आलीय. भाजपच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर पक्षाच्या कामांचे, कार्यक्रमांचे फोटेज अपलोड करणे, पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देणे, युजर्सच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे, त्यातून युवकांचा कल पाहणे, इतकंच नाही तर पक्षाच्या विरोधातल्या टीकेलाही एफबी आणि ट्टिवटरवरच उत्तर दिलं जातं.
केवळ भाजपचं नव्हे, काँग्रेसनेही सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरु केलाय. काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात तरुणांची फौज फेसबुक आणि ट्विटरवर काँग्रेसचा सातत्याने प्रचार करत असते. या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
केंद्रात सत्ता यावी यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची सोशल मीडियावर सध्या काँटे की कट्टर सुरुय.
फेसबुकवर भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं अशी दोन वेगवेगळी पेजेस आहेत. या कामासाठी 6 हजार लोकांची फौजच भाजपसाठी काम करतेय. तर काँग्रेसाठी राज्यात 5 हजार जणांची टीम तयार करण्यात आलीय. फेसबुकवर भाजपच्या पेजला तब्बल 3 कोटी 1 लाख 75 हजार 561 जणांनी लाईक केलंय. तर काँग्रेसला 2 कोटी 25 लाख 3 हजार 457 युजर्सनी लाईक केलंय.
फेसबुक प्रमाणेच ट्विटरवर भाजपला फॉलो करणारे तब्बल 4 लाख 8 हजार फॉलोअर्स आहेत. मोदींना फॉलो करणारे 3.61 मिलियन युजर्स आहेत. तर काँग्रेसला 1 लाख 53 हजार युजर्स फॉलो करतायत.
विशेष म्हणजे भाजपनं फेसबुकवर मोदी फॉर पीएम फंड सुरु केलाय. 100 हून अधिक रुपये तुम्ही फंड देऊ शकता. जे फंड देतील, त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ काढून काहींना मोदींना भेटण्याची संधी दिली जाणारंय. शिवाय मोदींसोबत डिनरचीही पर्वणी मिळणार आहे.
भाजप आणि काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनेही सोशल मीडियासाठी तयारी सुरु केलीय. सेना भवनातून शिवसेनेचा सोशल मीडियावर प्रचार सुरु आहे. युवकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाला पर्याय नसून यामुळे नक्कीच फायदा होईल असं मत शिवसेनेच्या प्रवक्त्या श्वेता परुळेकर यांनी व्यक्त केलंय.
पण दिवसभर फेसबुक आणि ट्विटरवर टिवटिवाट करणारी ही तरूणाई मतदानाच्या दिवशी बुथपर्यंत येईल, यासाठीही राजकीय पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे. अन्यथा नव्या सरकारच्या नावानं एफबी आणि ट्विटरवरच खडे फोडण्याची पाळी त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.