शाझिया इल्मी `आप`मधून बाहेर, केजरीवालांवर टीका

आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या नेत्या शाझिया इल्मी यांनी `आप`मधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शाझिया यांच्यासोबतच कॅप्टन गोपीनाथ यांनीही राजीनामा दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2014, 02:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या नेत्या शाझिया इल्मी यांनी `आप`मधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. शाझिया यांच्यासोबतच कॅप्टन गोपीनाथ यांनीही राजीनामा दिलाय.
यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाझिया यांनी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी ‘आप’मध्ये लोकशाही नाही... पक्ष दिशाहीन होत चाललाय अशी टीकाही त्यांनी केलीय.
अरविंद केजरीवाल यांना चिंतन करणं गरजेचं असल्याचं सांगत केवळ उद्य़ोगपतींवर टीका करणं चुकीचं असल्याचं शाझिया यांनी यावेळी म्हटलंय. गडकरी अवमान प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना उपदेशाचे डोस पाजताना ‘जेलच्या या खेळातून अरविंद केजरीवाल यांनी बाहेर यावं’ असा सल्ला त्यांनी दिलाय.
पक्षाची जनमाणसातील स्वच्छ प्रतिमा आता धुसर होत चाललीय. एक वेळ अशी होती की या पक्षात सहभागी होण्यासाठी अनेक रांगा लागलेल्या दिसत होत्या. पण, दिल्ली विधानसभा निवडणुकांपासून लोकसभा निवडणुका संपेपर्यंत या पक्षातून बाहेर पडण्यासाठीच अनेक जण धडपडू लागले. याच प्रवाहात आता शाझिया इल्मीही सामील झाल्यात.
इल्मी यांनी गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढविली. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. तसंच लोकप्रिय अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळख असलेल्य शाझिया यांना दिल्लीच्या आर के पुरम विधानसभा मतदारसंघातदेखील पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.