रथयात्रेत ‘राम’ राहिला की नाही, हे रथयात्रा सुरू होण्यापूर्वीचं कसं ठरवता येईल. अडवाणींनी आतापर्यंत ज्या काही रथयात्रा काढल्या त्या विशिष्ट उद्देशासाठी काढल्या आहेत. प्रत्येक मोहिमेचे वेगवेगळं महत्त्व असतं. भाजपच्या या मोहिमेचा उद्देश हा देशातून भ्रष्टाचार निर्मूलन व्हावा. यासाठी जनसामान्यांत चेतना निर्माण व्हावी, हा आहे. २००८ मध्ये भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या मुद्द्यावर आम्ही रणकंदन माजवलं होतं. भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकण्याचं काम सर्वप्रथम कोणी केलं असेल तर तो भाजप हा एकमेव पक्ष होता.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जनचेतना यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेला भाजपच्या संयुक्त समितीचं समर्थन आहे. या यात्रेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला नाही, ही टूम प्रसारमाध्यमात कुणीतरी सोडली आहे. परंतु, या बातमीमध्ये काहीच तथ्य नाही. नरेंद्र मोदींचा या यात्रेला विरोध असेल तर प्रसारमाध्यमांनी मोदींकडून हे वधवून घ्यावे. अशी कोपकल्पित बातमी प्रसारमाध्यमांनी पेरली आहे. ही माझ्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे. प्रसारमाध्यमांनी कोणतीही बातमी देताना तथ्य तपासूनचं द्यावे, हे संकेत आहे. परंतु, मी भाजपचा प्रवक्ता असताना मी या गोष्टीचा इन्कार करीत असताना विनाकारण अशी बातमी देऊन संभ्रम निर्माण करू नये.
मोदींनी पाठिंबा असल्याचे भाजपच्या संयुक्त समितीला कळवले, असताना विनाकारण अशा बातम्या देण्यात काही तथ्य नाही. जी यात्रा अजून सुरू झाली नाही. त्या बद्दल ती यशस्वी होईल का? त्याचा फायदा होईल का? हे प्रश्न उपस्थित करणे निरर्थक आहे.
संसदीय पद्धतीने संसदीय आयुध वापरून आम्ही संसदेत लढणार आहोत. महिला आरक्षण विधेयक हे भाजपमुळे संमत झाले आहे. परंतु, संसदेबाहेर जनतेपर्यंतही आम्ही पोहचणार आणि जनचेतना निर्माण करणार आहोत.
येत्या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही रथयात्रा काढली जात असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, देशाची एकूण राजकीय परिस्थिती पाहता दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निवडणुका आहेत. भाजपने २००८ पासून भ्रष्टाचारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यापासून प्रेरीत होऊन काही स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन उभं केलं. त्यात अण्णा, बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचा समावेश आहे. आता देशात भ्रष्टाचाराविरोधात लाट आहे. त्यात भाजपाने सुरू केलेलं आंदोलनाला यश दिसून येत आहे. त्यामुळे ही जनचेतना यात्रा त्यास अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.
शब्दांकन – प्रशांत जाधव