'दाटे' अंधाराचे जाळे

दिवाकर रावते महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.

Updated: Oct 22, 2011, 03:06 PM IST

दिवाकर रावते, आमदार शिवसेना 

 

महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, भ्रष्टाचार आणि लागोपाठ उघडकीस येणारे घोटाळे, पायाभूत सुविधा मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड त्यामुळे सर्वसामान्य माणूस अतिशय पिचून गेलेला आहे.

 

लोडशेडिंगसारखा काळा भस्मासूर साराच नाश करू पाहत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याविरूध्द शिवसेनेने आंदोलनची ठिणगी पेटवली आहे. अवकाश आहे तो या आंदोलनचा वणवा होण्याची. जनतेचा उद्रेक झाल्या शिवाय झोपी गेलेल्या सरकारला जाग येणार नाही. महाराष्ट्र एकेकाळी इतर राज्यांना वीज पुरवित होता, हे कोणाला सांगून खरंसुद्घा वाटणार नाही. शिवसेनेचं सरकार असे पर्यंत वीजेची टंचाई कधी भासली नव्हती.

 

काँग्रेस सरकार या बाबतीत अगदीच कुचकामी ठरलं. वीज निर्मिती सारख्या महत्वाच्या क्षेत्राकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष भोवलं. खाजगीकरण करण्यातच धन्यता मानणाऱ्या या काँग्रेस सरकारचं दहन करण्याची वेळ आली आहे हे आत विसरून चालणार नाही. वीज मिळावी म्हणून यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात,  कॅबिनेटपुढे विषय मांडावे लागतात. बरं दिल्लीश्र्वरांचा मनात आलचं तर भीक घातल्यासारखी 300 ते 400 मेगावॅट वीज महाराष्ट्राच्या पदरात पडते.

 

शिवसेना या विरोधात सातत्याने आवाज उठवतच राहणार हे काँग्रेसने लक्षात ठेवावं. शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला असलेला निकराचा विरोध आणि त्यामागची निश्चित भूमिका लोकांपर्यंत पोहचत नाही ही दारुण शोकांतिकाच म्हणावी लागेल. जैतापूर प्रकल्प उभारणीमुळे वीज टंचाईचा प्रश्न मार्गी लागेल असा दावा करणाऱ्या उपटसुंभांना वस्तुस्थितीची जाण आहे का असा प्रश्न मला पडतो.

 

कोकणासारख्या सुपिक प्रदेशात जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीमुळे आमचा शेतकरी यात भरडला जाणार आहे.  आणि शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 15 टक्के  इतकीच वीज येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार बाजारातून एवढी वीज घेण्या इतपत नक्कीच सक्षम आहे. त्यासाठी कोकणात प्रकल्प.... कधीच नाही.. अशक्यच..

 

या लोडशेडिंगने सामान्यांचे जगणं असह्य करुन सोडलं आहे.  आता तिमिरातून तेजाकडे महाराष्ट्र कधी वाटचाल करेल याची वाट पाहणं एवढचं आपल्या हाती उरलं आहे.

 

शब्दांकन - रोहित  गोळे