गट्टम...गट्टम, लठ्ठम-लठ्ठम!

सध्या जगात लठ्ठपणामुळे लोक त्रासले आहे. मात्र लठ्ठपणा म्हणजे पाश्चिमात्य देशातील श्रीमंत लोकांचा वर्ग असे समज आता चूकीचं ठरु शकतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 7, 2014, 07:29 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
सध्या जगात लठ्ठपणामुळे लोक त्रासले आहे. मात्र लठ्ठपणा म्हणजे पाश्चिमात्य देशातील श्रीमंत लोकांचा वर्ग असे समज आता चूकीचं ठरु शकतं. एका नव्या अहवालानुसार, विकसीत देशांबरोबरच विकसनशील देशातही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालल्याचं म्हटलं गेलंय. तसेच या अहवालात लठ्ठपणामध्ये भारतीयाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे सांगण्यात आलंय.
जगात दर तीन माणसांमागे एक लठ्ठ व्यक्ती असल्याचं ‘द ओव्हरसीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात दिसून आलंय. त्यानुसार जगभरात साधारण दीड अब्ज लोक लठ्ठ आहेत. हा अहवाल तयार करण्यासाठी या संस्थेने भारत, चीन, इजिप्त, पेरु आणि थायलंड या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांची निवड केली होती. तसेच १९८० ते २००८ या काळात या पाच देशांमधील लठ्ठ लोकांचेप्रमाण तिपटीने वाढल्याचे निदर्शनास आले.
या अहवालात मागील पन्नास वर्षांत या देशांमधील लोकांच्या आहारात झालेल्या बदलाच्या संबंधीत अभ्यास केला गेला. भारतात लठ्ठ व्यक्ती वाढण्या मागचे कारण म्हणजे, भारतात मोठ्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थांचे आणि मांसाहारी पदार्थांच्या सेवनात वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारतीयांचे वाढलेले उत्पन्न आणि स्वस्त दरातील अन्न हा भारतीयांच्या आहारामधील महत्वाचा मुद्दा असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. योग्य आहारासाठी पुढाकार आवश्यहक आहे. मात्र अन्न उत्पादन कंपन्यांबरोबर राजकरणीयांचे आर्थिक संबंध असल्याने भारतीय राजकारण्यांना आहारावर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत आहे.
भारतात लठ्ठपणा वाढल्यामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांना आमंत्रण दिले जात आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या लठ्ठपणावर लवकरात लवकर योग्य धोरण आखणे गरजेचे आहे, असा इशारा या अहवालात देण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.