मदर्स डे: पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसमोरील ५ समस्या

एका स्त्रीसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे तिचं आई होणं. 'मातृत्व' हे भगवंताचं महिलेला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. 

Updated: May 10, 2015, 10:13 AM IST
मदर्स डे: पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसमोरील ५ समस्या   title=

मुंबई: एका स्त्रीसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे तिचं आई होणं. 'मातृत्व' हे भगवंताचं महिलेला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. 

'आई'पण हे प्रत्येक स्त्रीमध्ये आपणहून येतं. मातृत्व, माया ही नैसर्गिकच स्त्रीमध्ये आहे. ती एक आई, गृहिणी, स्वयंपाक, नर्स, सल्लागार एवढंच नव्हे तर मुलांमध्ये संस्कार रुजविण्याचं काम करते. एवढ्या सगळ्या भूमिका आई आपल्या मुलांसाठी साकारत असते.

स्त्रीसमोर पहिल्यांचा मातृत्वाचा अनुभव घेतांना काही आव्हानंही असतात. त्यातील ५ महत्त्वाची आव्हानं पाहूयात...

सुरुवातीला स्तनपानासाठीचा संघर्ष: पहिल्यांदाच आई झालेल्या महिलेसमोरचं पहिलं मोठं आव्हान असतं ते स्तनपानाचं. कधी कधी स्तनपान करतांना होणारा त्रास, दूधाची कमतरता, दूध पाजल्यानंतर आणि पाजायच्या आधीची अस्वस्थता यामुळं सुरुवातीच्या काळात महिलांना थोडा त्रास होतो. बाळाला पाजण्याची सवय झाली की मात्र हा त्रास कमी होतो.

जर तुम्हाला स्तनपान करतांना त्रास होत असेल तर लगेच त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

झोपेपासून वंचित: पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना होणारा हा त्रास कॉमन आहे. बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत आईची झोप ही बाळाच्या शेड्यूल्डनुसार होते. रात्री झोप होणं कठीणच असतं. दिवसा बाळ झोपलं की आईलाही झोप पूर्ण करायला पाहिजे.  बाळ प्रत्येक तासाला उठतं आणि त्यानुसार आईलाही उठावं लागतं. झोप पूर्ण न झाल्यानं महिलांमध्ये नैराश्य, थकवा, संभ्रम आणि स्मृतीसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. 

या समस्येवर उपाय म्हणजे आपल्या कुटुंबियांची साथ... आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोप घेणं आवश्यक....

तुम्ही लठ्ठ दिसता: महिला गर्भवती होताच तिच्या वजनात फरक पडतो. ती लठ्ठ व्हायला लागते. तिची फिगर बदलते. अशावेळी आपण टीव्ही पाहणं बंद करायचं जेणेकरून टीव्हीवर दिसणाऱ्या स्लिम मॉमचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. 

आई होताच आपल्या वाढलेल्या वजनामुळं हायपर होऊ नका. वजन कमी करण्यासाठी नको त्या गोष्टी करू नका... लाइट व्यायाम किंवा योगा खूप फायदेशीर ठरू शकतो. 

पुन्हा नोकरी करण्याबाबत संभ्रमावस्था: जेव्हा तुम्ही आई होता तेव्हा तुमच्या नोकरीसंबंधी निर्णय घेण्याबाबत आपण संभ्रमावस्थेत असता. तुम्हाला नोकरीची गरज असते म्हणून तुम्ही कामावर जाता. पण दुसरीकडे आईला तान्ह्याबाळाला सोडून जायचा त्रास होत असतो. 

अशावेळी मनावर परिणाम न करून घेता इतर महिलांसोबत बोलून आपलं मन मोकळं करावं. आपल्या कंपनीत काही महिने कामाच्या वेळेबाबत फ्लेक्झिबल असण्याची विनंती करावी. 

स्वत:साठी वेळ नसतो: तुमच्या आयुष्यात नवा पाहुणा आलेला असतो. त्यामुळं त्याच्या पालकांचं संपूर्ण वेळापत्रक आणि वेळ त्या बाळाच्याच मागे असतो. महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. बाळाला वाढणवं हा २४x७ची नोकरीच असते. 

अशावेळी आपल्या पार्टनरकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून मदत झाल्यास उत्तम असतं. तसंच घरातील इतर कामांची जबाबदारी ही दोघांनीही वाटून घ्यावी. आपलं नातं आणखी दृढ करण्याचीही ही उत्तम वेळ असते. 

या सर्व आव्हानांमधून आपली आईही गेलीय हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. अशा या 'आई'ला मानाचा मुजरा... 

दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा केला जातो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.