www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता. अनेकदा लोक एखाद्या गोष्टीबद्दल इतका विचार करतात की ज्यामुळे हा विषय मानसिक तणावाचं कारण ठरू शकतं.
स्वस्थ जीवनासाठी तुमच्या मेंदूला आराम देणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी योगासनं महत्त्वाचे ठरतात. योगासनांच्या साहाय्यानं मेंदूला आणि बुद्धीला शांत ठेवता येऊ शकतं. जर तुमचं डोकं सतत कोणत्या ना कोणत्या विचारात राहत असेल तर तुम्हाला शांतता लाभू शकणार नाही.
रिलॅक्सेशन मिळालं नसेल तर तणावात आणि स्वास्थ्यामध्ये बिघाडच होईल. एक काम पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या कामात लक्ष घालणं यासाठी महत्त्वाचं ठरतं. जर तुमच्या हातात एखादं काम असेल तर दुसऱ्या गोष्टींबद्दल विचार करून वेळ व्यर्थ घालवू नका.
काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळेसाठी तरी डोळे बंद करून शांत बसायला हवं... त्यामुळे तुम्ही थोडं रिलॅक्स व्हाल. तुम्हाला हवं असेल आणि शक्य असेल तर एक छोटुशी डुलकी काढायलाही हरकत नाही. यामुळे काम करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा मिळते.
अनेकदा व्यक्ती कोणत्या तरी गोष्टीच्या परिणामांबद्दल किंवा भयानक गोष्टींबद्दल विचार करून करून आपली तब्येत बिघडवून घेतात. यातील अनेक परिणाम हे केवळ काल्पनिक असतात... ‘असं झालं तर तसं झालं तर...’ या गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. आपल्या निर्णयांचा आणि परिणामांचा लवकरात लवकर सामना करावा आणि निष्कर्षावर पोहचावं. तुम्ही फक्त विचारच करत राहाल तर वाईट विचारही येतच राहतील आणि तुम्हाला तणावातून बाहेर पडणं आणखीनच कठिण होईल.
यामुळे तुमची तब्येतही बिघडू शकते. चिंतन प्रक्रियेला मजबूत करायचं असेल तर सलग काही तरी गोष्टींचा विचार करणं बंद करा. जेव्हा गरज असेल तेव्हाच मेंदूवर ताण द्या आणि त्याला सक्रिय ठेवा. पण, गरज नसेल तेव्हा अनावश्यक गोष्टींचा विचार टाळून मेंदूला शांतता द्या. यामुळे तुमच्या मेंदूच्या शक्तीत वाढच होईल आणि तुमच्या आरोग्यावरही याचा परिणाम जाणवणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.