औरंगाबाद : एटीएमची पावती, बसचं तिकीट किंवा मॉलमध्ये आणि टोलनाक्यांवर मिळणाऱ्या गुळगुळीत पावत्या तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत... काय, धक्का बसला ना हे ऐकून... पण या पावत्यांच्या स्पर्शातून तुम्हाला विविध धोकादायक रोग होऊ शकतात.
एटीएमचा पेपर हाताळताय...? बसचं तिकीट घेताय...? सिनेमाचं तिकीट विकत घेताय...? मॉलमधलं बिल चेक करताय...? सावधान!
अगदी नकळत पांढऱ्या रंगाच्या या पावत्यांना आपण स्पर्श करतो. पण या साध्या वाटणाऱ्या पावत्या धोकादायक ठरू शकतात, याची तुम्हाला किंचीतशी कल्पनाही नसेल. आपण या पेपरला स्पर्श करतो आणि पाकिटात सुद्धा ठेवतो. मात्र, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एका अभ्यासानुसार यासाठी वापरला जाणारा गुळगुळीत पेपर म्हणजे थर्मल पेपर शरीरासाठी धोकादायक असल्याचं सत्य समोर आलंय.
ज्या गुळगुळीत कागदावर हे सगळं प्रिंट होतं त्या कागदातच कॅन्सरची बीजं दडलेली असतात. केवळ कॅन्सरच नव्हे तर वंध्यत्व, मेंदू, मज्जारज्जूचे आजार आणि आणखी काही गंभीर आजारही या कागदाच्या संपर्कातून होतात, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रसायन तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिलीय.
ही बिलं, पावत्या आणि तिकिटं देण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला ‘थर्मल प्रिंटर’ आणि त्यासाठीच्या कागदाला ‘थर्मल सेन्सिटिव्ह पेपर’ म्हणतात. हा कागद वजनानं हलका आणि कमी खर्चिक असल्यानं त्याचा वापर झपाट्यानं वाढतोय. मात्र, या कागदाच्या कोटिंगमध्ये मानवी शरीरावर घातक दुष्परिणाम करणारी रसायने म्हणजे ‘बीपीए’ वापरण्यात येत असल्याचं समोर आलंय.
बीपीए म्हणजे बायस्फेनॉल... हे एक औद्योगिक रसायन असून काही प्लास्टिक आणि रेझीन उत्पादनासाठी 1960 पासून वापरलं जातंय. बीपीए सोबतच थर्मल सेन्सिटिव्ह पेपरच्या कोटिंगमध्ये ट्रायरील मिथेन थॉलिड किंवा फ्लोओरन हे ल्युको डाय, बायस्फेनॉल ए (बीपीए) आणि बायस्फेनॉल बी (बीपीएस), झिंक साल्ट हे डेव्हलपर, इथेन, बेन्झिलोक्सिनाथिलेन हे सेन्सिटायजर्स आणि स्टॅबिलायजर्स हे घटक असतात. यामुळं स्तन आणि पौरुषग्रंथीचा कर्करोग, शुक्राणूंच्या प्रमाणात घट, पुरुषांचा मूत्रमार्ग आणि प्रजननेंद्रियाची असामान्य वाढ, महिलांमध्ये अकाली लैंगिक प्रौढत्व, मेंदू आणि मज्जासंस्थेच्या समस्यांमध्ये वाढ, अकाली स्थूलपणात वाढ, मधुमेहाची लागण आणि रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये घट अशा आजारांची लागण होण्याची मोठी भीती आहे. बीपीए रसायनांचा गर्भवती आणि स्तनदा मातांपासून बाळांना धोका होण्याची जास्त शक्यता असते.
जगातील अनेक देशात हा पेपर वापरण्यास बंदी आहे. कॅलिफोर्निया, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, मेरीलँड, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅनडा, मिनीसोटा या देशांनी हा पेपर दूर करून बीपीए फ्री पेपर वापरण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, आपल्या देशात या पेपरमुळे होणाऱ्या त्रासाची माहितीच नाही. त्यामुळं निदान यापुढं तरी हा पेपर हाताळताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.