www.24taas.com, लुधियाना
भारत म्हणजे बुद्धीमत्तेचा देश असं मानलं जातं, अनेक विद्वान आणि पंडित यांनी आपल्या ज्ञानाची चमक दाखवून भारताचं नाव जगभरात उंचावलं. असा भारत देश मात्र आता `अडाण्यांचा देश` झाला आहे. आणि असं म्हणणं आहे ते म्हणजे खुद्द भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे.
लुधियानामधील एका शाळेत आयोजित समारंभाच्यावेळी ते बोलत होते. जगभरातील सर्वात जास्त अशिक्षित भारतात आहेत आणि हेच भावी भारताच्या समोर मोठे आव्हान असल्याचेही मुखर्जी यांनी यावेळी म्हटले. शिक्षणाच्या वाटेवरून परतणार्यांमुळे देशात अशिक्षितांचे प्रमाण वाढत आहे.
अशिक्षितांची वाढत जाणारे हे प्रमाण भारताच्या प्रगतीच्या आड येत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोणत्याही देशाच्या विकासासाठी ज्ञान हेच मुख्य माध्यम असते. त्यामुळेच सुशिक्षित, ज्ञानसंपन्न पिढी निर्माण करणे हे शाळांचे ध्येय असले पाहिजे, असा धडाही त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना शिकवला.
एक शिक्षक आणि दोन चार वर्ग हे समीकरण हिंदुस्थानातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळते, पण किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक याचे प्रमाण ठरलेले असावे असाही महत्त्वपूर्ण मुद्दा यावेळी मुखर्जी यांनी मांडला. विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रमाण ही नुसती संख्या नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाट्याला शिक्षक येतील अशी ही रचना असायला हवी. शिक्षकांचे आपल्याकडे लक्ष आहे ही भावनासुद्धा विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल घडवणारी आहे, असाही महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला.
मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून केली. एकदा शिक्षकीपेशा स्वीकारलेली व्यक्ती आजन्म शिक्षक म्हणूनच जगते, असे सांगतानाच राष्ट्रपतींनी यावेळी शिक्षकाच्या भूमिकेतूनच उपस्थितांशी संवाद साधला.