इम्फाळ : १६ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला यांनी आज अखेर उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर त्या खूप रडल्यात. यावेळी त्या म्हणाल्यात मला मणिपूरची मुख्यमंत्री व्हायचेय. दरम्यान, भाजपकडून त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ केली आहे.
मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या म्हणून इरोम शर्मिला त्यांची ओळख आहे. १६ वर्षांपासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. आज हे उपोषण सोडताना त्यांना रडू कोसळले. मणिपूरमध्ये लष्कराला विशेष अधिकार देणारा (AFSPA) कायदा रद्द करावा या मागणीसाठी शर्मिला आंदोलन करत होत्या.
त्यांनी नऊ ऑगस्टला उपोषण सोडण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी उपोषण सोडले. मणिपूरमध्ये लष्कर विशेष अधिकार कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता. मणीपूरची मुख्यमंत्री बनून मला जनतेची सेवा करायची आहे असे उपोषण सोडल्यानंतर इरोम यांनी सांगितले.
अटकेत असल्यामुळे इंम्फाळच्या स्थानिक कोर्टाने त्यांना आज सकाळी जामीन मंजूर केला. इरोमला काही कट्टरपंथीय संघटनांनी धमकी दिल्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या.