नवी दिल्ली : तैय्यबा या आठ वर्षाच्या मुलीला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. तैय्यबाचे वडिल एका बुटाच्या कारखान्यात काम करतात, तैय्यबावरील आजाराच्या उपचारांसाठी १५ ते २० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तैय्यबाने मदतीसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राला उत्तर देत, तिला मदत देखिल केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून आलेले उत्तर पाहून तैयबाच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. खर्चाचा विचार न करता तैय्यबावर योग्य उपचार होत असल्याची खात्री करावी असे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. त्यानंतर दिल्ली सरकारने गुरु तेज बहाद्दूर रुग्णालयाला तैय्यबावर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
'माझे वडिल सतत चिंतेत असल्याबाबत मी आईशी बोलले. पंतप्रधान सर्वांना मदत करत असल्याचे मी टीव्हीवर पाहिले होते. मी भारतीय नागरिक असून मला जगण्याचा अधिकार असल्याने माझ्या मनात पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहिण्याची कल्पना आली', असे तैय्यबाने याबाबत बोलताना म्हटले आहे.
यापूर्वी तैय्यबा मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांकडे गेली होती. मात्र आवश्यक रक्कम जमा झाली नव्हती. तैय्यबाला मोठे होऊन बॅंकेत अधिकारी व्हायचे असल्याचेही तिने सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.