काँग्रेसचा 'हात' सोडत 'झाडू' घेऊन अलका लांबा आमदार

काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहूनही तिकिट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या अलका लांबा यांनी काँग्रेचा 'हात' सोडून हाती 'झाडू' घेत आमदारकी मिळविली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

Updated: Feb 10, 2015, 03:20 PM IST
काँग्रेसचा 'हात' सोडत 'झाडू' घेऊन अलका लांबा आमदार title=

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहूनही तिकिट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या अलका लांबा यांनी काँग्रेचा 'हात' सोडून हाती 'झाडू' घेत आमदारकी मिळविली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' आपणच सिकंदर असल्याचे दाखवून दिलेय. अरविंद केजरीवाल यांच्या एकेकाळच्या सहकारी किरण बेदी यांचा कृष्णनगर मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसमधून 'आप'चा झाडू हातात घेतलेल्या अलका लांबा या चांदनी चौक मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. 39 वर्षीय अलका लांबा यांचा एकेकाळी काँग्रेसमध्ये बोलबाला होता. 

अलका लांबा या स्टायलीश म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी नेत्यापासून झाली, आता त्या आपच्या आमदार झाल्या आहेत. आपच्या नेत्या अलका लांबा यांची एकेकाळी काँग्रेसमध्ये एवढी चलती होती. त्यांच्या कार्यालयात बडे बडे नेते हजेरी लावत होते. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या गुड बुकमध्ये अलका लांबा यांचे नाव सर्वात आधी येत होते. केसरी यांनीच त्यांनी NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले होते.

चांदनी चौक मतदारसंघातून आपच्या तिकीटावर विजयी झालेल्या अलका लांबा या देखील दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्ष होत्या. त्या दिल्ली निवडणुकांतील 'आप'चा तरुण चेहरा म्हणून समोर आल्या होत्या. उत्कृष्ट भाषणशैली आणि विविध माध्यमांमध्ये पक्षाची बाजू मांडतांना त्या वेळोवेळी दिसल्या आहेत. 

अलका लांबा यांनी 1994 मध्ये विद्यार्थी नेत्याच्या रुपात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. काँग्रेस प्रणित नॅशनल स्टूडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) मधून त्या पुढे आल्या. 2013 मध्ये अलका लांबा यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.