www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.
कार्बी ऍगलाँग, बोडोलॅण्डच्या मागणीसाठी आसामात हिंसाचार भडकला असून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिडम बंगालमध्ये गोरखालॅण्डसाठी दार्जिलिंगमध्ये बेमुदत बंद पुकारला आहे. तर उत्तर भारतातील उत्तर प्रदेशचे चार तुकडे करण्याची भाषा बसपा अध्यक्षा मायावतींनी केली आहे. तशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भासाठी तुणतुणे वाजत आहे.
काँग्रेस पक्षाने स्वतंत्र तेलंगणाला हिरवा कंदील दाखविला आणि यूपीएच्या बैठकीतही यावर शिक्कामोर्तब केले गेले. त्यानंतर तेलंगामध्ये जल्लोष पाहायला मिळाला. त्याचबरोबर काहींनी विरोधही केला आहे. परंतु तेलंगणाच्या निर्मितीबरोबर देशात अनेक राज्यांचे तुकडे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक राज्यांत वेगळ्या राज्यांची मागणी होऊ लागली आहे. आणि ही मागणी आता जोर धरू लागली आहे.
आसामसारख्या बांग्लादेशच्या सीमेवरील संवेदनशील राज्यात पुन्हा हिंसाचार भडकण्यास सुरूवात झाली आहे. धिपू, कार्बी ऍगलाँग जिल्ह्यात स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने काँग्रेसचे जिल्हा कार्यालय जाळून टाकले. नगरपालिका, इमारत, बस, मुख्याधिकाऱ्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही झाला. पोलिसांनी यावेळी लाठीहल्ला चढवत गोळीबार केला. यात २० जण जखमी झाले असून येथे बेमुदत संचारबंदी लागू केली आहे.
१९५१पासून आमची स्वतंत्र राज्याची मागणी असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दुसरीकडे स्वतंत्र बोडोलॅण्डच्या मागणीने जोर पकडला आहे. २ ऑगस्टला रेल रोको, तर ५ ऑगस्टला आसाम बंदची हाक दिली आहे. ‘ऑल कोच राजबोग्शी स्टुडंट्स युनियन’च्या विश्विजीत रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाने आसाम आणि पश्चि म बंगालमधील काही भाग मिळून स्वतंत्र कामतापूर राज्याच्या मागणीसाठी ३६ तासांचा बंद पुकारला आहे.
तेलंगणा निर्माण होऊ शकते, तर गोरखालॅण्ड का नाही? आमची मागणी तर १०७ वर्षे जुनी आहे. दार्जिलिंगच्या नेत्यांनी शनिवारपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. दार्जिलिंगमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे सरचिटणीस रोशन गिरी यांनी वेगळे राज्य हवे अशी मागणी केलेय.
स्वतंत्र तेलंगणाचे समर्थन करता येणार नाही. काँग्रेसने पाच वर्षांपूर्वी दिलेले तेलंगणाचे आश्वाचसन आताच का पूर्ण केले, निवडणुका उंबरठ्यावर असताना यूपीएने देशात आग का लावली, असा जळजळीत सवाल करीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.
दरम्यान, केंद्र सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य निर्मितीस मंजुरी दिल्यानंतर सीमा भागात तेलंगणाविरोधी आंदोलनाचा भडका उडाला. अखंड आंध्र संयुक्त कृती समितीने दिलेल्या बंदच्या हाकेला किनारपट्टी आणि रायलसीमातील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला. बंदच्या पार्श्व्भूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता, तर किनारपट्टीच्या भागात पोलिसांसह निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.