नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय.
बीएसएफचे क्लार्क नवरतन चौधरी यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर जाहीर केलाय. मोदींचं गुजरात 'ड्राय स्टेट' म्हणून ओळखलं जात असलं तरी इथे सैनिकांसाठी असलेली दारू काळ्या बाजारात विकली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
या व्हिडिओत त्यांनी लष्कराच्या कॅन्टीनमधील सैनिकांसाठी असलेली दारू बाहेर विकली जात असल्याचा आरोप केलाय. शिवाय पूँछमधल्या २९ बटालियनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
इतकंच नाही तर आपण याआधीही याबद्दलची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
चौधरी हे राजस्थानातील बिकानेरचे रहिवासी आहेत. कच्छमधल्या गांधीधाममध्ये तैनात असणाऱ्या बीएसएफच्या 150 बटालियनमध्ये ते कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.