अरुणा शानबाग यांच्या गुन्हेगाराला गावातून हाकलणार

के. ई. एम. रुग्णालयातील दिवंगत नर्स अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सोहनलाल वाल्मिकी बेघर होण्याची शक्यता आहे. सोहनलालला गावात राहू द्यायचं की नाही याबद्दल पंचायत निर्णय घेणार आहे. 

Updated: Jun 1, 2015, 12:10 PM IST
अरुणा शानबाग यांच्या गुन्हेगाराला गावातून हाकलणार title=

हापूर, गाझियाबाद: के. ई. एम. रुग्णालयातील दिवंगत नर्स अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सोहनलाल वाल्मिकी बेघर होण्याची शक्यता आहे. सोहनलालला गावात राहू द्यायचं की नाही याबद्दल पंचायत निर्णय घेणार आहे. 

अरुणा यांच्यावर अत्याचार करणारी व्यक्ती तीन दशकांहून अधिक काळ आपल्याचा गावात राहत आहे, हे समजल्यानं सर्व गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. १९७३ मध्ये वाल्मिकीनं अरुणा शानबाग यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर त्या कोमामध्ये गेल्या. याप्रकरणी वाल्मिकीला काही वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर मित्र, नातेवाईक यांनी वाल्मिकीशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तो त्याच्या पत्नीच्याच गावी रहात आहे. 

मात्र हा वाल्मिकी म्हणजे अरूणावर अत्याचार करणारी व्यक्ती असल्याचं गावकऱ्यांना माहित नव्हतं. अरुणाच्या मृत्यूनंतर मीडियानं वाल्मिकीचा शोध घेतल्यानंतर गावकऱ्यांना त्याच्याबद्दल कळलं आणि आता त्याला गावातून हाकलण्यात यावं, असं संतापलेल्या गावकऱ्यांचं मत आहे. मात्र त्याचं नेमकं काय करायचं याचा निर्णय पंचायत घेणार आहे.

एकीकडे गावकरी त्याच्यावर संतापलेले असताना सोहनलालचे कुटुंबीय मात्र यामुळं दुखावले असून या परिस्थितीसाठी ते मीडियाला जबाबदार ठरवत आहेत. 'माझ्या सासऱ्यांना त्यांच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं, त्यांनी त्यासाठी शिक्षाही भोगली. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ते शांतपणे जीवन जगत होते, पण मीडियानं या प्रकरणाला सनसनाटी वळण दिलं असून त्यांना पुन्हा माझ्या सासऱ्यांना जेलमध्ये पाठवयाचं आहे', अशी प्रतिक्रिया सोहनलालच्या उद्विग्न सुनेनं दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.