जुनागड : गुजरातमधील जूनागडमध्ये एका २० फूट लांबीच्या अजगरानं आख्ख्या नीलगाईला खाल्लं आहे. गिरनारच्या डोंगराळ भागातल्या गलियावाड इथं एका गावकऱ्याच्या शेतात ही घटना घडली आहे.
नीलगायीला विळख्यात घेतल्यानंतर या अजगरानं संपुर्ण निलगाय गिळंकृत केली. त्यानंतर मात्र त्याला चालणं-फिरणं अशक्य झालं.. ग्रामस्थांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या अजगरला ताब्यात घेतलं.
सध्या या अजगराला निरिक्षणाखाली ठेवण्यात आलंय. शिकार पचवल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती वनाधिका-यांनी दिली आहे.
हा अजगर 'इंडियन रॉक पायथन' या वर्गातील असून याची वाढ २५ फूटांपर्यंत होते. आपल्या शरिराहून मोठं भक्ष्य खाणं हे अजगराला सहज शक्य असतं, मात्र या अजगरानं खाल्लेल्या निलगायीच्या शिंगामुळे त्याला इजा होऊनये यासाठी त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आलंय.