www.24taas.com, गांधीनगर
आपल्या क्रिकेटमधील फलंदाजीइतकंच आपल्या वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूला गुजरातमध्ये प्रचारसाठी भाजपाने बिग बॉस-6मधून बाहेर बोलावून घेतलं. मात्र, त्याच्या बेछुट वक्तव्यांमुळे भाजपलाच कापरं भरलं आहे. त्यामुळे सिद्धूने प्रचारादरम्यान संयमाने बोलावं असे निर्देश त्याला देण्यात आले आहेत.
गुजरातमध्ये प्रचारकरत असताना स्टार प्रचारक नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या केशूभाई पटेलांवर हल्लाबोल करताना बेछुट आरोप केले. जुनागढच्या रॅलीमध्ये केशूभाईंवर टीका करताना सिद्धूने त्यांना देशद्रोही संबोधलं. केशूभाई भाजपामधून काँग्रेसमध्ये गेले. हा बदल म्हणजे गुन्हा असून ते गोमांस भक्षण करण्याइतकंच घृणास्पद पाप आहे असं सिद्धू म्हणाले.
सिद्धू यांचं केशूभाई पटेलांवर अशा पद्धतीने टीका करणं भाजपाच्या वरिष्ठांना रुचलेलं नाही. केशूभाई पटेल हे गुजरातमधील पटेल समाजातील नामवंत नेते आहेत. पटेल समाज हा गुजरातमधील मोठा आणि प्रभावशाली समाज आहे. सिद्धूच्या केशूभाईंवरील अशा आरोपांमुळे पटेल समाजाचं मन दुखावलं जाण्याची शक्यता वाटू लागल्यामुळे भाजपाने सिद्धू यांना आपल्या भाषणावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं आहे.