नवी दिल्ली: आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोपात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठिशी सरकार उभं राहिलंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली. सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, सुषमा स्वराज यांनी जे केलं ते योग्य होतं आणि मला ते योग्यच वाटतं. सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना केलेली मदत ही मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली मदत होती.
तर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांचा बचाव केलाय आणि म्हटलं, सुषमा स्वराज यांची यात काहीही चूक नाहीय. सुषमा यांनी जे केलं ते मानवीय दृष्टीकोनातून केलीय. दरम्यान, काँग्रेसनं सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
२०१३ मध्ये सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असताना त्यांनी ललित मोदींची मदत केल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. ब्रिटनमधील विद्यापीठात नातेवाईकाला प्रवेश मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी ललित मोदींची मदत घेतली होती. या मदतीच्या मोबदल्यात स्वराज यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून ललित मोदींना मदत केल्याचा दावाही केला जात आहे. ललित मोदी हे परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फरार असून ईडीने त्यांना नोटिसही बजावली होती. त्यामुळे भारताने फरार घोषीत केलेल्या व्यक्तीला मदत केल्याने सुषमा स्वराज गोत्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे परराष्ट्र मंत्रीपदावर विराजमान झाल्यावरही सुषमा स्वराज या ललित मोदींच्या संपर्कात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
तर सुषमा स्वराज यांनी ललित मोदींच्या पत्नीच्या कँसरवरील उपचारासाठी मानवतावादी दृष्टीनं त्यांना मदत केल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.