पणजी : जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय.
भाजप आमदारांच्या या विश्वासघातकीपणावर काँग्रेसनं कडाडून टीका केलीय. हा जनतेचा अपमान असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केलीय.
ब्राझीलमध्ये होणाऱ्या फुटबॉल वल्डकपसाठी गोव्यातून एका मंत्र्यांसह चार आमदारांचे शिष्टमन्डळ जाणार होते. यासाठी सुमारे ९० लाख रुपयांचा खर्च येणार होता. यात कामगार मंत्री आवर्तनो फुरतादो, वीज मंत्री मिलिंद नाईक यांच्या सह ग्लेन टिकलो, कार्लुस आल्मेदा, बेन्जामिन सिल्वा आणि मायकल लोबो या आमदारांचा समावेश होता. हा जनतेच्या पैशाचा अपव्य असून ही ब्राझील वारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. शिवाय नागरिकांमधूनही टीका झाली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यानी हा दौरा रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं.
मात्र, आज अचानक वीज मंत्री मिलिंद नाईक वगळता अन्य पाच जण ब्राझीलला रवाना झाले. यावर काँग्रेसनं कडाडून टीका केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.