चंदीगढ: 'हरियाणामध्ये भाजप सत्तेत आली तर राज्यातील तरुणांची लग्न बिहारी मुलींशी लावून देऊ. हरियाणातील एकाही तरूणाला लग्नाशिवाय राहू देणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांनी केलंय. या वक्तव्यानंतर धनखड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय.
धनखड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. तसंच मोदींची महत्त्वाकांक्षी योजना 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची प्रमुख जबाबदारी धनखड यांच्याकडे सोपवण्यात आलीय. सत्तेत आल्यानंतर भाजपमधील नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच लागलीय.
धनखड यांनी हरियाणा इथं एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त विधान केलंय. हरियाणात स्त्री-पुरुष यांचं सरासरी प्रमाण कमी असल्यानं अनेक तरुण अविवाहीत राहतात. यावर तोडगा सुचवताना धनखड म्हणाले, हरियाणात भाजपची सत्ता आल्यास हरियाणातील अविवाहित तरुणांचं बिहारमधील तरुणींशी लग्न लावून दिले जातील. त्यामुळं हरियाणातील एकही तरुण अविवाहित राहणार नाही.
धनखड यांच्या विधानावर अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला आहे. धनखड यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु असा इशारा संघटनांनी दिला आहे.
'मुंबईत 5 रूपयात पोट भरतं' असं विधान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केल्यानंतर आता ओम प्रकाश यांचं 'बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ' च्या वादग्रस्त वक्तव्यानं भाजपवर पुन्हा टीका होऊ लागलीय.
हरियाणामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या देशात सर्वात कमी आहे. त्यामुळे तिथे अनेक तरूण मुलांची लग्नच झालेली नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.