नवी दिल्ली : नॉएडातील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ २५१ रुपयांत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणल्याचा दावा केला आणि हा फोन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर एकच झुंबड उडाली. यामुळे कंपनीची वेब साईटही बंद पडली आणि बुकिंग बंद करण्यात आलं. पण, आता मात्र या फोनचे बुकिंग पुन्हा एकदा सुरू झालं आहे.
त्यासाठी इच्छुक ग्राहकांनी freedom251.com या वेबसाईटवर जाऊन रसिस्ट्रेशन करायचं आहे. कालपर्यंत एकापेक्षा जास्त फोन बुक करण्याची मुभा असली तरी आजपासून मात्र एका ईमेल आयडीवरुन एकच फोन बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत आता पेमेंटचा पर्यायही काढला आहे. कंपनीकडून ईमेल आलेल्या लोकांचे रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांना पुढील चार महिन्यांत हा फोन घरपोच पाठवला जाईल.
पण, भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमैय्या यांनी मात्र हा सर्व प्रकार म्हणजे एक मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या कंपनीची कागदपत्रे तपासल्यानंतर हा सर्व प्रकार बनावट असल्याचा त्यांनी दावा केला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी आता उत्तर प्रदेश सरकारकडे धाव घेतली आहे. कंपनीच्या मालकांच्या पार्श्वभूमीबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही त्यांनी एक पत्र लिहिले आहे.