पणजी : गोव्यातली माणसं समर्थ आहेत. इथल्या मातीतला माणूस मुख्यमंत्री होईल, दिल्लीचं पार्सल आम्हाला नको. असा टोला उद्धव ठाकरेंनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना लगावला. पर्रीकरांना गोव्यात परत पाठवत असाल तर ते केंद्रात अपयशी ठरले हे जाहीर करा. असंही उद्धव म्हणाले. गोव्यातील सालेगाव येथील जाहीर सभेत बोलत होते.
गोव्यात आमचंचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोव्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी उद्धव यांनी गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. भाजपने गेल्या पाच वर्षात गोव्यात काय केले, असा सवालही उद्धव यांनी विचारला.
भाजपने गोव्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. यापूर्वी गोव्यातील लोकांसमोर कोणताही पर्याय नव्हता. मात्र, यावेळी सुभाष वेलिंगकर, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीचा पर्याय गोवेकरांसमोर आहे. गोव्याची जनता आम्हाला नक्कीच जिंकवून देईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. आम्ही सत्तेसाठी लोभी नाही, असे ते म्हणालेत.