नवी दिल्ली : दिल्लीमध्ये बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स)च्या 'सुपरकिंग' या एका चार्टर्ड विमान कोसळून अपघात झालाय.
या दुर्घटनेत विमानात असणाऱ्या सगळ्या १० प्रवाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री महेश शर्मा यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिलेत.
दोन चालकांसहीत आठ इंजिनिअर्सला घेऊन दिल्लीहून हे विमान रांचीला जाणार होतं. पालम एअरपोर्टवरून या विमानाचं उड्डाण नियोजित होतं... परंतु, टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत द्वारकाजवळ बगडोला गावात या विमानाला अपघात झाला.
सकाळी ९.५० ला उड्डाण घेतलेलं हे विमान केवळ पाच मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे विमानतळाच्या भिंतीला आदळलं... आणि ते एका वॉटर प्युरिफिकेशन प्लान्टमध्ये घुसलं.... आणि विमानानं मोठा पेट घेतला... त्यानंतर ते जवळच्याच एका जलाशयात कोसळलं.
रांचीमध्ये एका हेलीकॉफ्टरमध्ये झालेला बिघाड दूर करण्यासाठी इंजिनिअर्स या विमानातून निघाले होते.
विमानप्रमुख चालक आणि बीएसएफचे उप-कमांडन्ट भगवती प्रसाद भट्ट, एसएसबीचे सेकंड इन कमांड आणि विमानाचे सहचालक राजेश शिवरेन, उप-कमांडन्ट डी कुमार, इन्स्पेक्टर राघवेंद्र कुमार यादव, इन्स्पेक्टर एस एस शर्मा, सब-इन्स्पेक्टर रविंद्र कुमार, सुरेंद्र सिंह, सी एल शर्मा, ए एस आय डी पी चौहान आणि कॉन्स्टेबल आर रावत अशी मृतांची नावं आहेत.
बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ११ सीटस् असलेलं 'सुपरकिंग' हे विमान १९९४-९५ मध्ये बीएसएफ दलात सामील करण्यात आलं होतं.