गाझियाबाद : बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय.
अटकेच्या भीतीनं खासदार आणि त्यांची पत्नी आजारी असल्याची बतावणी करत ताबडतोब हॉस्पीटलमध्ये भर्ती झालेत. हॉस्पीटलमधून सुट्टी मिळाल्यावर ताबडतोब पोलीस त्यांना अटक करणार आहेत. परंतु, त्यांचा मुलगा सागर कश्यप हा मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे.
कश्यप यांची पुत्रवधू हिमांशी हिची बुधवारी संशयास्पदरित्या गोळी लागल्यानं मृत्यू झाला होता. तिनं आत्महत्या केल्याचं कश्यप कुटुंबीयांचं म्हणणं आहे. परंतु, यानंतर मात्र नरेंद्र कश्यप आणि त्यांच्या मुलाविरुद्ध हुंडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हिमांशीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता. तिची सासू वारंवार फॉर्च्युनर गाडीसाठी तिचा छळ करत होती. यासाठी हिमांशीला अनेकदा मारहाणही करण्यात आली होती. याच मुळे तिची हत्या करण्यात आलीय.
२०१३ साली हिमांशीचं लग्न कश्यप यांचा मोठा मुलगा सागर याच्याशी धामधुमीत झाला होता. सागर हा डॉक्टर आहे. तर हिमानीनं बीएड पूर्ण करून आयएएस परिक्षेची तयारी सुरू केली होती. हिमांशी आणि सागरचा एक मुलगाही आहे.