लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विभाजनाला नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट नकार दिला आहे. हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्य़नाथांनी हे मत मांडलंय. स्वतः ज्या गोरखपूरचे आहेत तेथूनच पूर्वांचल नावाचं स्वतंत्र राज्य करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शिवाय छोटी राज्य बनवणे ही भाजपची राष्ट्रीय भूमिकाही आहेच असं असूनही योगी आदित्य नाथ मात्र या मागणीच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशचे आधीच एकदा विभाजन झालं आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि केंद्रात वेगवेगळ्या पक्षांची सरकारं होती. त्यामुळे विकासाची कामं झाली नाहीत. आता दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आम्ही विकास सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं योगी आदित्यनाथांनी स्पष्ट केलं आहे.