काँग्रेसची स्टंटबाजी : सोनियांसह ३५ मंत्री `बस`वर सवार

काँग्रेसने आपल्या नेत्यांबरोबर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी हरियाणातील सूरजकुंडमध्ये संवाद बैठकीचं आयोजन केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 9, 2012, 03:00 PM IST

www.24taas.com, सूरजकुंड

काँग्रेसने आपल्या नेत्यांबरोबर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी हरियाणातील सूरजकुंडमध्ये संवाद बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीसाठी आलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी चक्क बसमधून सवारी केली. सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ३५ मंत्र्यांनी बसनं प्रवास करत स्टंटबाजी केली. महागाईत जनता होरपळतेय. अशावेळी उधळपट्टी टाळण्यासाठी काँग्रेस मंत्रीही बसने प्रवास करु लागलेत, असा संदेश यातून देण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न मात्र लोकांच्या पचनी पडला नाही.
सरकारवर चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेला कसं उत्तर द्यावं याचा उहापोह या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जनतेला जी आश्वासनं दिली ती पूर्ण झाली का? आणि पक्ष संघटना आणि सरकारमध्ये कसा समन्वय साधायचा याबाबत या बैठकीत विचार होणार आहे. सोबतच राहुल गांधींना मोठी जबाबदारी देण्याबाबतही विचार होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक रामलीला मैदानात काँग्रेसनं फुंकलेल्या रणशिंगाचा हा दुसरा भाग समजला जातो. २०१४ च्या फायनलपूर्वी ही काँग्रेसची पहिली तयारी आहे. संघटनेत काय बदल अपेक्षित आहे, याची चर्चा या बैठकीत होणार आहे.
सहा तास चालणाऱ्या या मॅरेथॉन बैठकीत तीन भागांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पहिल्या सत्रात देशातल्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा होणार आहे, दुसऱ्या सत्रात देशासमोरील आर्थिक आव्हानांवर विचार होणार आहे तर तिसऱ्या सत्रात ‘२००९ च्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता आणि समीक्षा’ याबाबत चर्चा होणार आहे. याच आव्हानांच्या जोरावर २०१४ च्या महासंग्रामासाठी काँग्रेस मैदानात उतरणार आहे. भूतकाळाच्या आरशात वर्तमान आणि भविष्यातील पक्ष संघटनेची वाटचाल जोखल्यानंतर २०१४ पूर्वी एक चिंतन शिबिरही पक्षातर्फे करण्यात येणार आहे. २०१४ साली तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे, त्यामुळे त्यांची चिंताही स्वाभाविक आहे.