दिल्ली गँगरेप : 'तो' मोकाट सुटला; आज सगळ्यांच्या नजरा संसदेकडे!

बालगुन्हेगार न्याय विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहेत. या संदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

Updated: Dec 22, 2015, 09:07 AM IST
दिल्ली गँगरेप : 'तो' मोकाट सुटला; आज सगळ्यांच्या नजरा संसदेकडे! title=

नवी दिल्ली : बालगुन्हेगार न्याय विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहेत. या संदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येतोय. त्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले. बालगुन्हेगार न्याय विधेयक मांडण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी राज्यसभेत केली. अत्याचार करून केवळ अल्पवयीन असल्यानं संरक्षण मिळण्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बाल गुन्हेगार न्याय विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहे. या विधेयकावरील चर्चेवेळी निर्भयाचे आईवडीलही संसदेत उपस्थित राहणार आहेत.

देश सक्षम कायद्याची वाट पाहतोय...

संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया बलात्कार कांडातील बालगुन्हेगार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं मोकाट सुटलाय. मात्र, कोर्टानं बोट ठेवलंय ते दुबळ्या कायद्यावर... त्यामुळं तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला बालगुन्हेगारीचा सुधारीत कायदा तातडीनं मंजूर करण्याची मागणी जोर धरू लागलीय. 

अधिक वाचा - निर्भया प्रकरण : महिला आयोगाची याचिका कोर्टाने फेटाळली

न्याय न मिळू शकलेल्या मातेचा, दुर्दैवी निर्भयाच्या आईचा आक्रोश सगळ्या देशानं ऐकला... या देशातला कायद्याच्या दुबेळपणाचा फायदा निर्भयाचा गुन्हेगार बाल गुन्हेगारीचं प्रमाणपत्र घेऊन मोकाट सुटला. हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानंही कायद्यावर बोट ठेवून हतबलता दर्शवत निर्भयाच्या गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, यामुळं देशातले कायदे गुन्हेगारी रोखण्यास समर्थन नसल्याचंच या प्रकरणामुळं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. निर्भायावर बलात्कार झाल्यानंतर सारा देश पेटून उठला होता. सरकारनंही तातडीनं बालगुन्हेगारीच्या कायद्यात बदल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र, तो केवळ देखावा होता का? असा सवाल सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या महिला आयोगानंही केलाय.

अधिक वाचा - निर्भया गँगरेप : अल्पवयीन दोषीला वेळेपूर्वीच सोडून दिलं

संसदेत गेल्या तीन वर्षांपासून बाल गुन्हेगार कायदा सुधारणेच्या प्रतीक्षेत आहे. सत्तापालट झाला तरी कायद्यातल्या सुधारणेची गाडी मात्र तिथंच रुतली आहे. कायदा रखडल्याचं खापर भाजपनं मात्र काँग्रेसवर फोडलंय.

कायदा दुबळा आहे म्हणून आज निर्भयाचा एक गुन्हेगार मोकाट सुटलाय. मात्र, असे किती अपराधी बालगुन्हेगारीचं कवच घेऊन मोकाट फिरणार आहेत? कायद्यातल्या सुधारणेसाठी अजून किती निर्भया बळी जाण्याची वाट सत्ताधारी आणि विरोधक पाहणार आहेत?