चिमुरडीवर अत्याचार, दुसरा आरोपी बिहारमध्ये!

चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल.. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या दुस-या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2013, 11:10 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
चिमुरडीवर झालेले अत्याचार पाहून सारा देश सुन्न झालाय. दोन दिवसांपर्यंत चिमुकलीला बंधक बनवत करण्यात आलेले अत्याचार पाहून कोणाचंही हृदय हेलावून जाईल.. चिमुकलीवर आता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ती बरी व्हावी यासाठी सारा देश सध्या प्रार्थना करत आहे. तर या घटनेत सहभागी असलेल्या दुस-या आरोपीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारमध्ये दाखल झालेत.
दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरीक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत. मुख्यालयासमोर उभारलेली बॅरिकेडस तोडून आंदोलकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मागितलेली लाच, आंदोलक तरुणीला केलेली मारहाण आणि एकूणच तपासात झालेली दिरंगाई याचा रोष लोकांच्या मनात आहे.

गुन्हेगारांना कोणाचाही धाक उरलेला नाही, दिल्लीत कायद्याचं राज्य उरलेलं नाही, अशा घोषणा आंदोलक देताना दिसत आहेत. आंदोलनाची धग केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या घरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यानं तिथली सुरक्षा वाढवण्यात आलीय.
दरम्यान, दिल्लीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय. बिहारमधल्या मुझ्झपरनगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. तर दुसराही आरोपी बिहारमध्ये असल्याने पोलीस बिहारमध्ये दाखल झाले आहेत.