नवी दिल्ली : दिल्लीत आज अकरावी आंतरराज्य परिषद होतीयं. यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमधील सरकार बरखास्तीचं प्रकरण आणि त्यानंतर न्यायालयाकडून केंद्र सरकारला बसलेला दणका, जीएसटीवरुन सुरु असलेला तिढा आणि काश्मीरमधील हिंसाचार या ताज्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य संबंधित केंद्रीय मंत्री, तसेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत उपस्थित रहाणार आहेत.
आंतरराज्य परिषदेची ही अकरावी बैठक असून यापूर्वी दहावी बैठक यूपीएच्या सत्ता काळात डिसेंबर २००६ मध्ये झाली होती.
या बैठकीच्या पार्श्वभूमूवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा बैठक बोलावली होती. सर्व खात्यांच्या सचिवांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. या बैठकीला शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांशी महाराष्ट्राने करार केलेत. याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पाणी, सीमा प्रश्न आदी विषयही या परिषदेत मुख्यमंत्री मांडणार आहेत.