नवी दिल्ली : देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.
परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाल्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यावेळी रामदास आठवले यांनी खोब्रागडे यांच्या भेटीसाठी थेट बराक ओबामा यांची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
अमेरिकतील भारताच्या वाणिज्यदूतवासातील उच्च-उपायुक्तपदावर असताना अटक केल्यानंतर त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा त्यावेळी सत्तेवर असलेल्या तत्कालिन काँग्रेस सरकार आणि विरोधात असलेल्या भाजप दोघांनीही निषेध केला होता. या प्रकरणामुळे भारत-अमेरिकेतील संबंधही ताणले गेले होते.