www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या हैदराबादमधील `ओबामा स्टाइल` भाषणावर उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आलंय. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी तर मोदींची `फेकू देसी ओबामा`, अशी खिल्ली उडवत नव्या वादाला तोंड फोडलंय. दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देत मोदींविरोधी मोहिमेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
हैदराबादमध्ये आपल्या भाषणाची सुरूवात तेलुगूत करणाऱ्या मोदींनी भाषणाचा शेवट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्टाइलमध्ये केला. ओबामांनी `यस, वुई कॅन. यस, वुई विल डू`, अशी साद घालून अमेरिकी जनतेची मनं जिंकली होती. तोच कित्ता मोदींनी गिरवला. `यस वुई कॅन...`, असं आवाहन त्यांनी सभेला जमलेल्या गर्दीला उद्देशून केलं. नेमक्या याच वाक्याचा समाचार घेत दिग्विजय यांनी घेतलाय.
दिग्विजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करताना `आपल्याला आता फेक देसी ओबामा मिळाला आहे. या `फेकू`ची सध्या जोरात चलती आहे`, अशा शब्दांत मोदींची खिल्ली उडवलीय.
फेसबूक आणि ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर प्रोफाइल तयार करण्यास आणि आपले फोटो पोस्ट करण्यास मुस्लिम समाजाच्या महिलांना मौलवी आणि मुफ्ती यांनी नकार दिला आहे. त्यांच्या मते हे कृत्य मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे. अशा मौलवी आणि मुफ्तींना दिग्विजय सिंह यांनी समाचार घेतलाय. मात्र मौलवीवर टीका करतानाही दिग्विजय यांनी मोदींना टोला लगावला. `कट्टरपंथीय मंडळी आपल्याला मध्यकालीन युगात नेण्याचा घाट घालत असून त्यांनी आता तरी फेसबुक आणि इंटरनेट हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असल्याचे सत्य स्विकारायला हवे`, असा टोला लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.