मोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव

डॉक्टरांनी करून दाखवलेल्या करिश्म्यामुळे पाच महिन्यांचा एक जीव आता घरी जाण्यासाठी तयार आहे. 

Updated: Jun 2, 2016, 05:34 PM IST
मोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव title=

नवी दिल्ली : डॉक्टरांनी करून दाखवलेल्या करिश्म्यामुळे पाच महिन्यांचा एक जीव आता घरी जाण्यासाठी तयार आहे. 

६५० ग्रॅम वजनाचं अर्भक

इशिता असं या अर्भकाचं नाव आहे... ती आता पाच महिन्यांची झालीय... आश्चर्य म्हणजे इशिता जेव्हा जन्मली होती तेव्हा तिचं वजन एखाद्या मोबाईलपेक्षाही कमी म्हणजेच केवळ ६५० ग्रॅम होतं... आता पाच महिन्यांनंतर मात्र इशिताचं वजन २.५ किलो झालंय.

डॉक्टरांचा करिश्मा... 

उल्लेखनीय म्हणजे, तेलंगनातल्या नालगोंडा या मागासभागातील एका सरकारी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी हा करिश्मा करून दाखवलाय. इशिताला पाच महिन्यांपूर्वी जेव्हा हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा तिची जिवंत राहण्याची आशा फारच कमी होती. डॉक्टरदेखील १.२ किलोपेक्षा कमी वजनाच्या अर्भकाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याबाबत साशंक होते. परंतु, या अर्भकाचे आई-वडील खुपच गरीब होते. त्यामुळे आम्ही या अर्भकाला दाखल करून घेतलं, असं डॉक्टरांनी म्हटलंय. 

'कांगारू केअर'ची मदत 

काही दिवसांच्या मेहनतीनंतर आणि कांगारू केअरनंतर या अर्भकाच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा दिसू लागली. हॉस्पीटलनं एक नर्स केवळ या बाळासाठी नियुक्त केली. इशिताच्या आईपेक्षाही जास्त काळजी या हॉस्पीटलनं घेतली. इशिताच्या आजीच्या म्हणण्यानुसार, हा केवळ डॉक्टरांचाच करिश्मा आहे.