नवी दिल्ली : भारतीय सीमेवर पाकिस्तान विरोधी कारवायांवर अधिक लक्ष ठेवणे आता भारतीय सैन्याला सोप जाणार आहे, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने प्रचंड क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास 'पंछी' हे नाव देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने चालणारे हे विमान अति उंचीवरील धावपट्टीवरही उतरू शकेल. जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता 'पंछी' करडी नजर ठेवणार आहे.
सध्या लष्कराकडे मानवविरहित 'निशांत' विमान आहे. याच्या माध्यमातून शत्रूच्या भागात जाऊन टेहळणी करता येते. पण या विमानाची क्षमता अधिक नसल्याने ते अति दुर्गम भागात पोहोचू शकत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी ८ महिने संशोधन करून 'पंछी' या मानवविरहित विमानाची निर्मिती केली.
आतापर्यंत लष्कराकडे असलेली मानवविरहित विमाने ही धावपट्टीवरून कधीच उडू शकत नव्हती. ती रिमोट कंट्रोलने खाली आणावी लागत होती.
मात्र 'पंछी' धावपट्टीवरून उड्डाण करू शकणार आहे. त्यामुळे अति उंचीवर, डोंगरावर हे विमान सहजरीत्या उतरविणे शक्य होणार आहे. कंट्रोल करण्याची रेंजही वाढविण्यात आली आहे. हे दिवसा आणि रात्रीही टेहळणी करू शकेल.
हिमवर्षाव, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत उड्डाणाची याची क्षमता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.