पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या साखळी इथल्या प्रचारसभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस बजावलीय. निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका.
पाच हजार दिल्यास तिप्पटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घेऊन 'आप'च्या झाडूलाच मतदान करा असं विधान केजरीवाल यांनी या सभेत केले होते. याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना ही नोटीस बजावलीय.
केजरीवाल यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या सीडीतून स्पष्ट होत आहे, असा आयोगाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे १९ जानेवारीला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 1 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना दिलेत.