www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडच्या प्रलयात नाशिकचे सत्तर प्रवासी अडकले आहेत. उत्तर महाराष्ट्रातले अडीचशे पेक्षा अधिक भाविक चारधाम यात्रेला गेले असताना हा प्रकार घडलाय. तर औरंगाबादहून यात्रेसाठी गेलेले 40 पेक्षा जास्त भाविकही या महाप्रलयात अडकलेत. लासुर स्टेशन परिसरातील या 40 लोकांच्या ग्रुपशी गेल्या 48 तासांपासून संपर्क झालेला नाही. त्यामुळे या भाविकांच्या नातेवाईकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. यातले काही जण रेल्वेनं तर काही जण खासगी ट्रॅव्हल्सनं चारधाम यात्रेसाठी गेले होते. या पर्यटकांमध्ये बहुतांशी वृद्ध असल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले शेकडो पर्यटक अडकले आहेत. पर्यटन तसंच चार धाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेलेल्या या नागरिकांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतोय. अडकलेल्या व्यक्तींशी संपर्कही होत नसल्यानं या नागरिकांच्या नातेवाईकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. या नागरिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काळजी करतोय. तसंच झी २४ तासनंही हे प्रकरण सतत लावून धरलंय.
उत्तर काशीमध्ये अडकलेल्यांसाठी आपत्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आलीय. छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे कक्ष सुरू करण्यात आलंय. 9561499449 आणि 0253-2317151 असे त्याचे क्रमांक आहेत. दरम्यान झी २४ तासनं नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांकडून सर्वोतपरी मदत मिळत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.