नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामुळे सरकारी कामकाजाचे अधिकाधिक डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कर्मचारी भविष्य निधीतील रक्कम काढण्यासाठी अलिकडेच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अशा सुविधेद्वारे कर्मचाऱ्याने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर निधीची रक्कम थेट बॅंकखात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र अद्याप ही सुविधा कार्यरत झालेली नाही. याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी आम्ही 'आधार' खात्यातील माहितीचा उपयोग करत आहोत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे.
परंतु सर्व पीएफ खाते आधारवररून जोडलेले नाहीत. सध्या कर्मचाऱ्यांना काही सुविधा ऑनलाईन देण्यात आलेल्या असून रक्कम काढण्याची सुविधाही नजीकच्या काळात देण्यात येईल', असेही अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.