www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज भारताचा स्वातंत्र्यदिन... देशाचा ६७ वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावर होतोय साजरा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहन झालं यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा डौलानं फडकलाय. राजधानी दिल्लीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते देशाचा स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधानांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सीमेवर कुरापती करत गोळीबार करणाऱ्या पाकला खडे बोल सुनावले.
महत्त्वाच्या विषयांवर बोलताना काय म्हटलंय पंतप्रधानांनी पाहुयात...
लोकपाल
लोकपाल विधेयक लोकसभेत पास झाले आहे. राज्यसभेची मंजूरी मिळाल्यावर लवकरच त्याचा कायदा तयार होईल. लोकपालमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
अन्न सुरक्षा विधेयक
अन्नसुरक्षा विधेयकाबाबत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला. गरिबी हटवण्याबाबत सरकारचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. अन्नसुरक्षा योजना ही देशातील सगळ्यात मोठी योजना असून देशातील ८१ कोटी जनतेला या योजनेचा लाभ होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. अन्न सुरक्षा विधेयक गरिबांसाठी संजिवनी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तराखंड महाप्रलय
उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केलंय. तसंच बचावकार्यात संरक्षण दलानं बजावलेल्या कार्याचं कौतुकही केलं.
सिंधुरक्षक पाणबुडी अपघात
काल भारताची सिंधुरक्षक ही पाणबुडी बुडाली, त्यात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची शंका आहे. त्याबाबत पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं.
पाकच्या ‘ना’पाक कारवाया
पाकिस्तानच्या नापाक कारवाया भारत कदापी सहन करणार नाही, असे खडे बोल पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावलेत. भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला दहशतवाद थांबवावा लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.
भारताची युवा पिढी
यूपीए सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण करताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योजनांचा उल्लेख केला. प्रगतीशील भारतासाठी विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सरकारच्या मिड डे मिलसारख्या योजनांना यश आल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. बालमृत्यूचा दर घसरल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात ८ आयआयटी, १६ केंद्रीय विद्यापीठं, १० एनआयटी स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.