मुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू

मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 31, 2013, 10:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुजफ्फरनगर
मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय. या घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समजतंय. जवळपास महिनाभरापूर्वीच याच जिल्ह्यात घडून आलेल्या सांप्रदायिक हिंसेत जवळपास ६२ जण ठार झाले होते. त्यापार्श्वभूमीवर तणाव वाढल्यानं प्रशासनानं तात्काळ प्रभावित क्षेत्रात कलम १४४ लागू केलंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा हिंसा उसळल्यानं जिल्ह्यातील सुरक्षा वाढवलीय. आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीय. जिल्हा मॅजिस्ट्रेट कौशल राज यांच्या म्हणण्यानुसार मोहम्मदपूरसिंह गावातील दोन समुदायाच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षात चार जणांना जबर मारहाण करण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या हिंसेत मारले गेलेले लोक एक महिन्यापूर्वी उसळलेल्या दंग्यानंतर पुनर्वसन शिबीरांत राहत होते. त्यामुळे या भागात उसळलेल्या सांप्रदायिक तणावानं गंभीर रुप धारण केलंय, असंच दिसतंय. मुजफ्फरनगर जिह्यातील ज्या भागांत गेल्या महिन्यात सांप्रदायिक हिंसा उसळली होती त्यात मोहम्मदपूरसिंह या गावाचाही समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मोहम्मदपूरसिंह गावातील लोकांचा संघर्ष हुसैनपूर गावातील लोकांसोबत झालाय यामध्ये चार जणांनी प्राण गमावलेत. या दोन गांवांमध्ये जवळजवळ एक किलोमीटरचं अंतर आहे, परंतु त्यांची शेती मात्र जवळपासचं आहेत.

पाच व्यक्ती मोहम्मदपूरसिंह गावातील रहिवाशांच्या एक समुदाय सदस्यांविरुद्ध हल्ल्याची योजना आखत होते, अशी अफवा काही लोकांनी पसरवली होती. त्यामुळे ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाचं म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनानं छावणीत राहणाऱ्या आणि आपापल्या घरी परत जाण्यात नकार देणाऱ्या लोकांसाठी ९० करोड रुपयांचा निधी मंजूर केलाय. जवळपास १,८०० कुटुंबांनी जिवाच्या भीतीनं आपल्या घरी परतण्यास नकार दिलाय. यातील बहुतेक कुटंब मुस्लीम आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.