उपमुख्यमंत्र्यांची धडपड : दोन रेल्वे, दोन विमानं, टॅक्सीनं केला प्रवास

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उद्या (शनिवारी) आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय. याची कुणकुण लागताच या पदावर दावा करण्यासाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांची धडपड सुरू झालीय.

Updated: Nov 7, 2014, 09:16 PM IST
उपमुख्यमंत्र्यांची धडपड : दोन रेल्वे, दोन विमानं, टॅक्सीनं केला प्रवास title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उद्या (शनिवारी) आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय. याची कुणकुण लागताच या पदावर दावा करण्यासाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांची धडपड सुरू झालीय.

भारतीय जनता पार्टीनं मनोहर पर्रिकर यांच्यानंतर राजेंद्र आर्लेकर यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडलं असल्याची चर्चा जेव्हा डिसूझा यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना धक्काच बसला.... आणि आपणंही या स्पर्धेत आहोत हे दाखवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. 

मुख्यमंत्रीपदाची सूत्रं दुसऱ्याकडे सोपवण्यापूर्वी आपण केंद्राकडे काही वेळ मागितलाय असं पर्रिकर यांनी सांगितल्यानं निश्चिंत झालेले डिसूझा आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनला फिरायला निघाले होते. ते १६ तारखेला परतणार होते. पण, केंद्रानं पर्रिकर यांना आणखी वेळ देण्यास नकार दिला... आणि डिसूझा यांना घाम फुटला. 

पर्रिकर शनिवारीच राजीनामा देणार असल्याचं समजताच, गुरुवारी सकाळी दहा वाजता लंडनला निघालेले डिसूझा धावपळ करत शुक्रवारी दुपारी परत गोव्यात दाखल झाले. यासाठी त्यांनी दोन ट्रेन, दोन विमानं आणि एका टॅक्सीचा आसरा घ्यावा लागला. 
 

'उद्या मी मुख्यमंत्री असेन नाहीतर काहीच नाही'

गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांनी पर्रिकर यांच्यानंतर आपलाच मुख्यमंत्रीपदावर हक्क असल्याचा दावा केलाय. ‘आजचा (शुक्रवार) दिवस माझ्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून शेवटचा दिवस असेल... उद्या (शनिवार) एक तर मी मुख्यमंत्री असेल किंवा काहीच नसेल... मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी घेण्याचं वचन मला दिलंय... त्यांनी आता त्यांचं वचन पाळायलाच हवं’ असं म्हणत डिसूझा यांनी सरकारला शेवटचा अल्टिमेटमचं देऊन टाकलाय. 

आपल्याला १० आमदार आणि सहा कॅबिनेट मंत्र्यांचा पाठिंबा असल्याचंही डिसूझा यांनी यावेळी जाहीर केलंय. ‘मी आत्ता ६० वर्षांचा आहे... मी फार काळ काही राजकारणात राहू शकणार नाही... मला शांततेत निरोप द्या’ असं आर्जवही डिसूझा यांनी यावेळी केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

Tags: