बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील. पण, लग्नाच्या जेवणात एखादा पदार्थाची चव आवडली नाही म्हणून लग्न मोडल्याचेतुम्ही ऐकले नसेल. पण, कर्नाटकातील एका गावात हा प्रकार घडलाय. तुमाकुरू जिल्ह्यातील एका लग्नात जेवणातील सांबार आणि रस्समची चव न आवडल्याने एका नवरदेवाने चक्क लग्नच मोडलेय.
शनिवारी एका जोडप्याच्या लग्नाचा स्वागतसमारंभ झाला. या समारंभात जेवणातील सांबार आणि रस्समची चव बिघडली होती. रविवारी लग्नाचे विधी सुरू असताना वरपक्षातील काही लोकांनी याविषयी कुरबुर सुरू केली.
नवरदेवसुद्धा लग्नाचे विधी सोडून या वादात सामील झाला आणि त्याच्या घरच्यांची बाजू घेऊ लागला. शेवटी वाद इतका टोकाला गेला की नवरदेव त्याच्या कुटुंबीयांसोबत लग्नमंडपातून निघून गेला. त्यांचे हे वागणं पाहून वधूपक्षातील लोक अवाक झाले.
शेवटी वधू पक्षाकडून लग्नासाठी आलेल्या एका दूरच्या नातेवाईकाने या वधूला लग्नाची मागणी घातली. ही मागणी तिने लगेच मान्य केली आणि त्यांचा विवाह पार पडला. एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे वाटणाराच हा सर्व प्रकार होता.