सीतामढी : कोर्टात खटला आणि तो पण चक्क देवाविरुद्ध... ही बाब ऐकायला जरी खोटी किंवा गंमतीशीर वाटत असली तरी ती प्रत्यक्षात घडलीये.
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात राहणाऱ्या वकील ठाकूर चंदन कुमार सिंग यांनी भगवान रामचंद्रांवर खटला दाखल केलाय. हा खटला आहे सीतेची छळवणूक केल्याचा.
वकील बुवांच्या मते ते ज्या भागात राहतात त्याच भागातून रामाची पत्नी सीता आली होती. रामाने एका धोब्याच्या सांगण्यावरुन सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली होती. राम सीतेशी खूप निर्दयीपणे आणि क्रूरपणे वागला, असाही त्यांचा आरोप आहे. यात रामाला त्याचा भाऊ लक्ष्मणाने साथ दिल्याचा आरोपही करण्यात आलाय.
चंदन कुमारांच्या मते त्रेता-युगात (म्हणजेच रामाच्या काळात) महिलांवर अन्यायाला सुरुवात झाली. आज महिलांवर होणारा अन्याय ही त्याची परिणती आहे. म्हणून सीतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आजच्या महिलांना न्याय मिळणार नाही, असा त्यांचा दावा आहे. आज म्हणजे सोमवारी या खटल्याची सुनावणी होणार आहे.