नवी दिल्ली : दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.
या दहशतवाद्यांचे नेतृत्व महंमद खुर्शिद आलम हा पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक करत आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे, अशी माहितीही मिळालेली आहे. यापूर्वी गुप्तचर यंत्रणांकडील माहितीनुसार, 2015 च्या सप्टेंबरमध्येही खुर्शिद भारतात आला होता. त्यावेळी त्याने आसाममधील काही जिल्ह्यांमध्ये प्रवासही केला होता.
हे ६ दहशतवादी २३ फेब्रुवारी रोजी भारतात आले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. पठाणकोट येथील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर काही ठिकाणी कुंपण नाही, या ठिकाणांहून घुसखोरी करत १ जानेवारी रोजी काही दहशतवादी भारतात आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता.