मराठी पायलटने सांगितली, 'विमान हायजॅक'ची कहाणी

मागच्या आठवड्यात एअर इंडयाचं विमान हायजॅक झाल्याचा अलार्म मिळाल्यानंतर एकच धांदल उडाली होती. नंतर सगळं सुरक्षित असल्याचं लक्षात आलं आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण, नेमक्या याच वेळी विमानाच्या कॉकपीटमध्ये काय प्रकार सुरू होता हे या एअर इंडियाच्या विमानाच्या मराठी महिला पायलटनं पोलिसांसमोर सांगितंय.

Updated: Oct 23, 2012, 05:59 PM IST

www.24taas.com, तिरुअनंतपुरम
मागच्या आठवड्यात एअर इंडयाचं विमान हायजॅक झाल्याचा अलार्म मिळाल्यानंतर एकच धांदल उडाली होती. नंतर सगळं सुरक्षित असल्याचं लक्षात आलं आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण, नेमक्या याच वेळी विमानाच्या कॉकपीटमध्ये काय प्रकार सुरू होता हे या एअर इंडियाच्या विमानाच्या रुपाली वाघमारे या मराठी महिला पायलटनं पोलिसांसमोर सांगितलंय.
यावेळी प्रवाशांनी विमानात एकच गोंधळ घातला होता. कॉकपीटमध्ये घुसून काही प्रवाशांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळेच आपली धांदल उडाली आणि विमान हायजॅकचा अलार्म वाजला गेला, असं स्पष्टीकरण रुपाली वाघमारे या मराठी पायलटनं दिलंय. यासंबंधी रुपालीनं काही प्रवाशांच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल केलंय.
१९ ऑक्टोबर रोजी अबूदाबीवरून कोच्चीकडे उड्डाण करणाऱ्या या विमानात जवळजवळ २०० प्रवाशी चढले होते. खराब हवामान असल्यामुळे हे विमान कोची विमानतळाकडे वळवण्यात आलं होतं. पण, या गोष्टीचा अंदाजा न आल्यानं प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यातील काही प्रवाशांनी विमानाच्या पुढच्या टोकाला असणारं पायलटंच कॉकपीट गाठलं. ‘माझ्या सहा महिन्यांच्या मुलाला काही झालं तर तुला ठार मारण्यात मी मागे-पुढे पाहणार नाही’ अशीही एका प्रवाशानं आपल्याला धमकी दिल्याचं रुपालीनं एफआयआरमध्ये म्हटलंय.
मात्र, विमानात महिला आणि मुलांनाही पाणी आणि जेवणाची सोय केलेली नव्हती. तसंच वारंवार विचारणा करूनही विमान कोचीकडे का वळवण्यात आलं याचं उत्तर काही विमान क्रूकडून मिळालं नसल्याची तक्रार प्रवाशांनी केलीय.