सुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2012, 03:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दिल्लीत एका खासगी बसमध्ये एका २३ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. यातील प्रमुख आरोपींना फाशी देण्यासाठी आणि कायद्यात बदल करण्यासाठी दिल्लीत युवकांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाच्यावेळी झालेल्या झटापटीत आणि हिंसाचारात पोलीस हवालदार सुभाष तोमर हे जखमी झालेत. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गृहमंत्रालयाने त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांने सांगितले की, दिल्ली पोलिसांनीही सुभाष चंद तोमर यांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीशिवाय केंद्राकडून १० लाख रूपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही अडीच लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे.